Advertisement

नक्षलवाद्यांच्या चकमकीत जवान महेश नागुलवार शहीद: मुख्यमंत्र्यांनी केली कुटुंबाला 2 कोटींचे अर्थसहाय्य मंजुर !

गडचिरोली :  दि.12 फेब्रु. नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सी-60 तुकडीचे जवान महेश नागुलवार शहीद झाले आहेत. चार्मोशी तालुक्यातील अनखोडा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश नागुलवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि आई असा परिवार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महेश नागुलवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. महेश नागुलवार यांना अखेरची मानवंदना देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांचा तळ आमच्या सी-60 च्या बहाद्दर जवानांनी उदध्वस्त केला आहे. मात्र दुर्दैवाने या कारवाईत सी-60 पथकातील पोलिस अंमलदार महेश कवडू नागुलवार हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून गडचिरोलीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रयत्नांची शर्थ करुनही त्यांना वीरमरण प्राप्त झाले. 

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, नक्षलमुक्त भारताच्या अभियानात त्यांनी राष्ट्रासाठी दिलेली आहुती आम्ही कधीच विसरणार नाही आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पोलिस अधीक्षकांशी मी स्वत: बोललो आहे. महाराष्ट्र पोलिस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. महेश कवडू नागुलवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची मदत आणि विविध लाभांसह 2 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फुलणार आणि दिरंगी गावाच्या जंगलात नक्षल छावणी उभारण्यात आल्याचे कळाले होते. या गोपनीय माहितीच्या आधारे सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांचे 18 सी -60 पथक अभियानावर होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. सुमारे दिवसभर ही चकमक चालली. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने नक्षल तळ उद्ध्वस्त केले असून अनेक साहित्य व सामान पथकाने जप्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *