Advertisement

कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपास सुरुवात; मंत्री छगन भुजबळांचा आक्षेप, मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण?

ए आय न्युज नेटवर्क निलेशकुमार शहारे

मुंबई दि.18सप्टेंबर2025 ; राज्य सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. पण आता मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही जे जीआर काढले आहेत त्या जीआर प्रमाणे जे पात्र आहेत त्यांना दाखले मिळतील. यातील किती लोकांना कुणबी प्रमाणपत्राचे दाखले मिळाले याची आकडेवारी माझ्याकडे नाही. पण कुठूनही मिळत नाही अशी तक्रार आलेली नाही. त्यामुळे त्याची जे काही योग्य कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता, त्यानंतर ज्या दोन समित्या तयार केल्या आहेत त्यांचा अहवाल याच्या आधारावर मिळेल.

छगन भुजबळांच्या आक्षेपावर फडणवीसांचे स्पष्टीकरण

मंत्री छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, भुजबळ साहेब यांनी जे म्हटले आहे त्या संदर्भात या पूर्वीच मी स्पष्ट केले आहे खाडाखोड चालणार नाही. ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याच नातेवाईकांना दाखले मिळतील, आपला कायदा आहे. जर कोणाला एखाद्याला मिळालेल्या दाखल्यावर आक्षेप असेल तर तो आक्षेप घेऊ शकतो. त्यामुळे भुजबळ साहेबांच्या जर कुठे नजरेस आले असेल तर निश्चितपणे दखल घेऊन त्यासंदर्भात तक्रार दाखल केली तर त्यावर उचित कारवाई केली जाईल.

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकणे निषेधार्य

मुंबई येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्यात आला होता. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. यावर प्रश्न विचारण्यात आला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा प्रकारची घटना ही निषेधार्य आहे. ज्या कुठल्या समाजकंटकाने ही घटना केली आहे त्याला पोलिस शोधून काढतील आणि कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणे हे मला योग्य वाटत नाही.

महाराष्ट्राचा आलमाटीची ऊंची वाढवण्यासाठी विरोध

सध्या आलमाटी धरणाच्या उंचीवरून वाद सुरू आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचा आलमाटीची ऊंची वाढवण्यासाठी विरोध आहे. या संदर्भात आवश्यकता पडली तर महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि कर्नाटक राज्याच्या विरोधात पीटिशन करेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महसूल विभागाच्या वतीने सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. यात वेगवेगळ्या प्रकारच्या 10 महत्त्वाच्या योजना राबवण्यात येत आहेत. पाणंद रस्त्यांचे मॅपिंग असेल किंवा लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे असेल, जे वाद आहेत ते वाद संपवण्याच्या गोष्टी या माध्यमातून करण्यात येणार आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *