Advertisement

घर बांधणाऱ्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: घरकुलांना मिळणार 5 ब्रास मोफत वाळू, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेची घोषणा

Ai न्युज नागपूर दि.15 मार्च: घरकुल बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. घरकुल बांधणाऱ्यांसाठी आता मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्यातील घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाहू मोफत देण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोफत वाळू देण्याच्या निर्णयाची घोषणा केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत. ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे. त्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव होईल. तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहोत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशरला प्रोत्साहन

एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असे वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये दगड खाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशरसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्या माध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून, त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल. तसेच येत्या दोन वर्षांत वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टोन क्रशर लागणार आहेत. त्यातून वाळू तयार होणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

राऊतांच्या बोलण्याकडे माझे लक्ष नसते

एकनाथ शिंदे हे काँग्रेसच्या वाटेवर होते, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, त्यांनी त्यावर जास्त बोलणे टाळले. या राज्यात विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत. संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचे काही लक्ष नाही, माझेही लक्ष नाही, असे ते म्हणाले. आता जनतेला विकास पाहिजे. त्यामुळे आमच्यासमोर आता पॉलिटिकल प्रश्नांची, राजकीय सरबत्तीची प्रायोरिटी नाही. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला आमचे सरकार कसे न्याय देईल? जनतेला दिलेला संकल्प आम्ही पूर्ण कसा करू? याकडे आमचे लक्ष आहे. संजय राऊतांकडे आमचे लक्ष नाहीये, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांच्या दाव्यावर उत्तर देणे टाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *